सलमान म्हणतोय शाहरूख माझा मित्रच

‘बिग बॉस-सीझन ७’मध्ये रविवारी प्रदर्शित झालेल्या भागावेळी टायगर सलमानने ‘किंग खान’ शाहरूख त्याेचा खास मित्र असल्याचे सांगून टाकले आहे. त्याच्या या वक्तव्यााने सर्व चाहत्यांना आश्चर्ययाचा धक्का बसला आहे. एकेकाळी एकमेकाचे तोंड न पाहणा-या सलमानने शाहरूखचा उल्लेख चक्क मित्र म्हणून केला आहे.

रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस’च्या सेटवर ‘गोरी तेरे प्यार मे’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी इमरान खान आणि करीना कपूर हे दोघे दाखल झाले होते. बिग बॉसच्या सेटवर प्रमोशनसाठी येणा-या प्रत्येक सेलिब्रिटींशी सलमान मस्ती-मस्करी करत असतो. पण करीना-इमरानशी गप्पा मारताना सलमानने चक्क शाहरुखचा उल्लेख आपला ‘मित्र’ म्हणून केला.

‘गोरी तेरे प्यार मे’, या सिनेमात इमरान खान एका दक्षिणात्य युवकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावरून इमरानने सलमानला विचारलं की ‘तू असा एखादा सिनेमा केलाय का… ज्यात तुम्ही दाक्षिणात्य युवकाची भूमिका केली आहे’. या प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणाला, ‘मी असा रोल केला नाही, परंतु माझ्या मित्राने-शाहरुखने मात्र ‘रा-वन’ या सिनेमात दाक्षिणात्य युवकाची भूमिका केलीय’. सलमानच्या तोंडून शाहरुखसाठी ‘मित्र’ हा शब्द ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकेच नव्हे तर समोर बसलेल्या प्रेक्षकांसह इमरान-करीनालाही हा धक्का जरा जास्तच जोरात लागला.

यावर्षी झालेल्या बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत शाहरूख खान आणि सलमान खान यांनी एकमेकांना मिठी मारली होती. त्या दोघांना पुन्हा एकत्र बघून सर्व समिकरण बदलली आणि त्यांचे चाहतेही खूश झालेले दिसले होते.