तामिळींवरील अत्याचाराप्रकरणी लपवण्यासारखे काहीही नाही-राजपाक्षे

कोलंबो – श्रीलंकन सरकार आणि एलटीटीईमधील गृहयुद्धाच्यावेळी तामिळी जनतेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी लपवण्यासारखे काहीही नसल्याचे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी गुरुवारी सांगितले. श्रीलंकेत होत असलेल्या राष्ट्रकुल देशाच्या चोगम’ परिषदेच्या पूर्वसंध्येला राजपक्षे यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत पत्रकारांनी युद्ध गुन्ह्यांसंबंधी प्रश्‍न विचारून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

लिट्टे आणि श्रीलंकन लष्करामधील युद्धाच्यावेळी जे काही घडले त्यात लपवण्यासारखे आमच्याकडे काहीही नाही. देशात कायदेशीर यंत्रणा आहे. युद्धकाळात अन्याय, अत्याचार, छळ आणि हत्या झाल्या असतील तर लोक त्याविरोधात रीतसर तक्रार नोंदवू शकतात, असे राजपक्षे यांनी सांगितले. मानवाधिकराचे उल्लंघन करण्यामध्ये कोणी दोषी आढळला तर त्याविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. या परिषदेत भारताच्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युद्धाच्यावेळी तामिळी जनतेच्या विरोधात जे गुन्हे झाले त्याचा निषेध म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग या परिषदेत सहभागी झालेले नाहीत.