प्रसिद्ध लेखक सदानंद मोरे यांना जीवे मारण्याच्या धमक्या

पुणे – नामवंत लेखक व कवी सदानंद मोरे यांना अज्ञात लोकांकडून गेल्या कांही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे समजते. मोरे यांनी या संदर्भात पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर त्यांना पोलिस संरक्षण दिले गेले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार एका टिव्ही चॅनेलवर बोलताना मोरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल तसेच पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात कांही आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. तेव्हापासून त्यांना त्यांच्या सेलफोनवर अज्ञात व्यक्तींकडून धमक्या दिल्या जात असून त्यात तुम्हाला ठार केले जाईल असा दम दिला जात आहे. मोरे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना पोलिस संरक्षण दिले गेल्याचे तसेच त्यांच्या घराबाहेर पोलिस गस्त वाढविली गेल्याचे पोलिस उपायुक्त विशेष शाखा एम.बी. तांबे यांनी सांगितले.