मुंबई – मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानच्या दुसर्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या टीमला दणका दिलाय. पहिली बॅटिंग करणारी वेस्ट इंडिजची बॅटिंग भारतीय बॉलिंगसमोर अक्षरश: ढेपाळली. 182 धावांवर विंडीजने नांगी टाकली आहे. मोहम्मद शमी, आर.अश्विन आणि प्रग्यान ओझाच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडीजच्या खेळाडूंनी लोटांगण घातले.
180 रन्सच्या आतच विंडीजचे 9 बॅट्समननी तंबूचा रस्ता धरला. फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीनं ओपनिंगला आलेल्या ख्रिस गेलची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर स्पीन बॉलर आर अश्विन आणि प्रग्यान ओझानं मधली फळी कापून काढली. अश्विननं 3 विकेट घेतल्या. अश्विननं डॅरेन सॅमीची विकेट घेत आपल्या टेस्ट कारकिर्दीतली 100वी विकेट घेतली. तर प्रग्यान ओझानं 4 विकेट घेत विंडीजला दणका दिला.
दरम्यान, अगोदर भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भारताच्या बॉलर्सनं कॅप्टन धोणीचा हा निर्णय योग्य ठरवलाय. कारण पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि आर अश्विननं विकेट घेत विंडीजला दोन धक्के दिलेत. तर लंच नंतर प्रग्यान ओझानं आणखी एक विकेट घेतली. लंचनंतर विंडीजचा संघ गडगडला. 162 धावांवर 8 गडी बाद अशी अवस्था विंडीजची झाली. त्यानंतर विंडीजचा संघ 182 धावांवर ऑलआऊट झाला.