वानखेडे स्टेडियमवर कडेकोट पोलिस बंदोबस्त

मुंबई – मुंबई पोलिसांनी सचिनच्या २०० व्या कसोटी सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर १,१९६ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रेक्षकांना बनावट तिकिटांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तिकीटविक्रीसाठी उडालेली झुंबड आणि काळ्याबाजाराबरोबरच बनावट तिकीटविक्रीची भिती व्यक्त केली जात आहे.

स्टेडियमच्या सुरक्षेसाठी एमसीएने तब्बल ३५२ सीसीटीव्ही बसवले असून, प्रेक्षकांना अनेक बंधने लादण्यात आली आहेत. पाण्याच्या बाटल्यांसह जास्त चिल्लर नाणीही नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्टेडियमच्या ७ प्रवेशद्वारांवर १४५ धातूशोधक यंत्रे बसवण्यात आली असून, ६ बॉम्बशोधक व नाशक पथके, १२ शीघ्र कृती दले, १६ अत्याधुनिक वाहने (मार्क्‍समेन) आणि ६ राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

सामन्यादरम्यान सचिनला स्टेडियममध्ये एकटे न फिरता संघाबरोबरच राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. प्रेक्षकांना अनेक बंधने लादण्यात आली आहेत. पाण्याच्या बाटल्यांसह जास्त चिल्लर नाणीही नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.