राज्यभरात थंडीचा कडाका वाढला

मुंबई- गेल्या काही दिवसापासून ऑक्टोबर हिटचा जोर ओसरताच तापमानात घट होत गुलाबी थंडी राज्यभरात दाखल झाली आहे. उत्तर भारतात दाखल झालेली थंडी दोन दिवसांतच मध्य भारतात पोहोचली आहे. त्यामुळे थंडीचा राज्यात प्रवेश झाल्याची अधिकृत घोषणा पुणे प्रादेशिक हवामान खात्याने केली आहे.

राज्यातील थंडीचे वारे हे किनारपट्टीवर दाखल होण्यास आणखी काही अवधी लागणार असल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले.राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील थंडीसाठी कारणीभूत असलेले वारे हे जास्त प्रभावी झाल्याने त्यांनी दोन दिवसांतच मध्य भारतापर्यंतचे अंतर पार केल्याचे पुणे प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

राज्यभराच्या वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच आकाशही निरभ्र आहे. वातावरणातील ही स्थिती थंडीसाठी अनुकूल असल्याने या वा-यांचा जोर राज्यभरात अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सरासरी तापमानात अजून घट होणार असल्याची शक्यताही खोले यांनी व्यक्त केली.

Leave a Comment