पाटणा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभर बडी आघाडी संघटित करण्याची कल्पना मांडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष केंद्रात सत्तेवर असलेल्या सं.पु. आघाडीचा घटक पक्ष आहे, परंतु या पक्षाने सं.पु. आघाडी बळकट करण्याची कल्पना मांडण्याऐवजी सर्व पक्षांना एकत्रित करून मोदीविरोधी आघाडी संघटित करण्याची कल्पना मांडली आहे. याचा अर्थ कॉंग्रेस पक्ष मोदींच्या विरोधात ताकद संघटित करू शकत नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक तारिक अन्वर यांनी ही कल्पना मांडली आहे. देशभरात नाही तर हरकत नाही, पण निदान उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे तारिक अन्वर यांनी म्हटले आहे. तारिक अन्वर हे काही बोलतात ते शरद पवार यांचेच म्हणणे असते. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एवढा व्यापक धोरणात्मक गोष्टींविषयी शरद पवार यांच्याशिवाय कोणी बोलूच शकणार नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मनात आगामी लोकसभा निवडणुकांविषयी अनिश्चिततेची भावना आहे. चौदा वर्षांपासून कॉंग्रेसच्या सोबत असूनही आताच्या निवडणुकात राष्ट्रवादीला कॉंग्रेसची सोबत नको वाटत आहे. गेल्या महिन्यात भाजपा आणि कॉंग्रेसला सोडून अन्य चौदा पक्षांची बैठक झाली. तिला सुद्धा राष्ट्रवादीचे नेते हजर होते. बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या १२० जागा जो पक्ष जिंकेल तोच देशावर राज्य करू शकतो. ही संधी भाजपाला मिळू नये म्हणून निदान या दोन राज्यात तरी सर्वांनी मिळून भाजपाचा पराभव करावा, असे तारिक अन्वर यांचे म्हणणे आहे.