श्रीनगर – हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये हिवाळ्याचा परिणाम जाणवू लागला असून काश्मीरच्या विविध भागांमध्ये कडाक्याची थंडी पडून हवामान शून्य अंशाच्या खाली गेले आहे. सोमवारी मध्यरात्री काश्मीर खोर्यात खूप थंडी पडली आणि मंगळवारी सकाळपर्यंत राज्याच्या विविध शहरातले तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले. चालू हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद या काळात झाली. चालू वर्षीचा गोठणबिंदूच्या खाली तापमान जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजधानी श्रीनगरमध्ये उणे ०.७ एवढे तापमान सोमवारच्या मध्यरात्री नोंदले गेले. दक्षिण काश्मीरमधील पहेलगाम हे पर्यटन स्थळ राज्यातले सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. तिथे उणे ४ अंश तापमान नोंदले गेले. पहेलगाममध्ये त्या आधीच्या रात्री उणे २ अंश तापमान होते. ते आणखी दोन अंशांनी घटले आणि या पर्यटनस्थळातले जनजीवन पूर्ण ठप्प झाले.
उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे उणे ३.४ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली. कोकर्णा, कुपवाडा, क्वाझिगुंड या ठिकाणी गोठणबिंदूच्या खाली तापमान गेले. पूर्ण काश्मीर खोर्याचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाण्याची ही या हंगामातली पहिलीच वेळ आहे.