बंगळूर – भारताच्या माहिती तंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र असल्यामुळे कर्नाटकाने शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठी आघाडी घेतली असून परदेशातून भारतात शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची कर्नाटक ही पहिली पसंती असते, असे दिसून आले आहे. उच्च शिक्षणासाठी भारतात येणार्या विद्यार्थ्यांपैकी ३६ टक्के विद्यार्थी कर्नाटकात शिकायला येतात. याबाबतीत कर्नाटकाने पहिला क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका पाहणीमध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. कर्नाटकात महाविद्यालये भरपूर आहेत आणि शिक्षक मोठ्या संख्येने आहेत. ही कर्नाटकाची दोन वैशिष्ट्ये ठरली आहेत.
गतवर्षी परदेशातील २७ हजार ५३१ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात आले. त्यातल्या १० हजार विद्यार्थ्यांनी कर्नाटकात विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि कॉन्ङ्गिडरेशन ऑङ्ग इंडियन इंडस्ट्री या दोन संस्थांनी मिळून या संबंधातली आकडेवारी गोळा केली आहे. तिच्यानुसार कर्नाटकाच्या खालोखाल आंध्र प्रदेशाचा क्रमांक लागतो. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांपैकी ४,६९८ विद्यार्थ्यांनी या राज्यात प्रवेश घेतला. महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे.
कर्नाटकात ३,०९८ महाविद्यालये आहेत आणि या बाबतीत कर्नाटकाचा देशात चौथा क्रमांक आहे. महाविद्यालयांच्या संख्येत कर्नाटक मागे असले तरी परदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटकात २३ विद्यापीठे असून या राज्यातील महाविद्यालयांचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने जास्त आहे. एक लाख लोकसंख्येमागे ४४ महाविद्यालये असे हे प्रमाण पडते. या संबंधात देशाची टक्केवारी एक लाख लोकसंख्येला २३ महाविद्यालये अशी आहे.