एकाच रोपावर टोमॅटो आणि बटाटे

एकाच रोपावर एकाचवेळी लालभडक टोमॅटो आणि चांगल्या प्रतीचे बटाटे मिळाले तर शाकाहारी लोकांसाठी ती पर्वणीच ठरेल हे लक्षात घेऊन कृषी संशोधकांनी या जातीचे रोप विकसित करण्यात यश मिळविले आहे. टोमॅटैटो असे या रोपाचे नामकरण केले गेले आहे. म्हणजे टोमॅटो व पोटॅटो देणारे रोप.

हॉर्टिकल्चर कंपनी थॉमसन अॅन्ड मॉर्गन ने ही रोपे ब्रिटनच्या बाजारात आणली आहेत. कलमपद्धतीने ही रोपे तयार केली असली तरी त्यात कोणतेही जनुकीय बदल केले गेलेले नाहीत. त्यामुळे या रोपांवर येणारे टोमॅटो व खाली येणारे बटाटे हे सर्वसामान्य बटाटे व टोमॅटोसारखेच आहेत. इतकेच नव्हे तर ते अधिक चविष्ट आणि पौष्टिकही असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीचे गाय बर्टर म्हणाले की यापूर्वीही संकरातून टोमॅटो व बटाटे एकत्र देणारे रोप तयार केले गेले होते मात्र तो केवळ प्रयोग होता. मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टीने त्याची लागवड व शेती केली गेली नव्हती. अशी शेती आता प्रथमच केली जात आहे. कंपनीचे प्रमुख पॉल हानसोर्ड म्हणाले की गेली दहा वर्षे हे संशोधन सुरू आहे. टोमॅटो व बटाटे संकरातून नवीनच वाणाचे फळ तयार होण्याची भीती होती. तसेच दोन्ही वेगळे आले तरी त्यांची साल पातळ असणे गरचेचे होते. गेल्या मोसमातच या रोपांपासून उत्पादन घ्यायला सुरवात झाली असून ते कमालीचे यशस्वी ठरले आहे. बागेत, किचन गार्डनमध्ये अथवा अगदी कमी जागेतही ही रोपे लावणे शक्य आहे.

न्यूझीलंडमध्ये अशी रोपे तयार केली गेलीअसून त्याचे नामकरण पोटॅटो- टॉम असे केले असल्याचेही समजते.

Leave a Comment