वादग्रस्त मुस्लीम नेत्याशी दिग्गी राजांची हातमिळवणी

संभल – उत्तर प्रदेशातील वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू तौकीर रजा खान याच्याशी संपर्क साधल्यामुळे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे वादाच्या भोवर्‍यात सापडले असतानाच कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी या वादग्रस्त नेत्यासोबत एका सभेत भाग घेतला आणि तिथे केलेल्या भाषणात त्याची प्रशंसा सुद्धा केली. अरविंद केजरीवाल यांनी या धर्मगुरूशी संधान साधले तेव्हा त्यांच्यावर कॉंग्रेसच्याच नेत्यांनी टीका केली होती. आता ती टीका करणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे.

उत्तर प्रदेशातील काल्की महोत्सवात दिग्विजयसिंग आणि तौकीर रजा खान एका व्यासपीठावर आले. दिग्विजयसिंग सध्या समाजवादी पार्टीवर शरसंधान करत आहेत. समाजवादी पार्टीने भाजपाशी संधान साधून मुझफ्ङ्गरनगर मध्ये दंगली पेटवल्या, असा त्यांचा आरोप आहे. परंतु तौकीर रजा खान याला या समाजवादी पार्टीच्या सरकारने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिलेला आहे. तौकीर रजा खान आणि आचार्य प्रमोद कृष्णन् या दोघांनी गायींच्या कतलीच्या विरोधात मोहीम सुरू केली असून हिंदू-मुस्लीम एकतेचा पुरस्कार केला आहे.

असे असले तरी तौकीर रजा खान यांच्यावर दंगलींचे आरोप आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी त्यांना भेटणे हे वादाचा विषय ठरले. कॉंग्रेसचेच प्रवक्ते मीम अङ्गझल यांनी या संबंधात केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल तौकीर रजा खान यांना भेटून जातीय राजकारण करत आहेत, असा आरोप मीम अङ्गझल यांनी केला. मात्र त्यांच्या टीकेची शाई वाळण्याच्या आतच कॉंग्रेसच्याच दिग्विजयसिंग यांनी तौकीर रजा खान यांच्या गळ्यात गळा घातला.