
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नरेन्द्र मोदी यांना आशिर्वाद दिला आणि ते पंतप्रधान व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली पण त्यामुळे पित्त खवळलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनी लतादिदींना आपण काही पुस्तके पाठवून देणार असल्याचे म्हटले . त्या पुस्तकातून त्यांना नरेेेन्द्र मोदी यांचा इतिहास कळेल असे त्यांचे म्हणणे आहे. लता मंगेशकर यांच्या इतिहासाचे आणि त्यांच्या राजकीय मतांचे अज्ञान या मागे आहे. आता विषय इतिहासाचा निघाला म्हणून सांंगावेसे वाटते की, लतादिदींनी आव्हाडांना त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतिहासाविषयी दोन प्रश्न विचारले तर त्यांची किती त्रेधा उडेल. पण याचे भान आव्हाड यांना नाही. कारण त्यांना सातत्याने टीव्हीवर दिसायला लागल्यापासून प्रसिद्धीची नशा चढली आहे. या नशेमध्ये शुद्ध हरवलेले लोक दारूच्या नशेतल्या माणसापेक्षा सुद्धा वाईट वर्तणूक करतात, भ्रमात जगतात आणि स्वत:ला आहे त्यापेक्षा मोठे समजतात. आव्हाडांना मोदी, लता मंगेशकर आणि आपण एकाच पातळीवर आहोत असे भासायला लागले आहे. म्हणून त्यांनी लता दिदींना काही पुस्तके नेऊन द्यायचे ठरवले आहे. मोदींनी किती लोकांना विकासापासून वंचित ठेवले आहे आणि किती लोकांवर अन्याय केला आहे हे दाखवून देण्याचा त्यांचा विचार आहे.
मोदी जर देशाला न्याय देत नाहीत आणि सोनिया गांधी न्याय देतात तर मग सोनिया गांधींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून लोकांना किती न्याय दिला आहे आणि खरेच न्याय दिला असेल तर देशातली ६६ टक्के जनता आपल्या गरजेएवढे धान्य खरेदी का करू शकत नाही? त्यांना अन्न सुरक्षा का द्यावी लागते? आणि या उपरही सोनिया गांधी या दयाघन आणि देशातल्या गरिबांचे कल्याण करणार्या नेत्या असतील तर जितेंद्र आव्हाड यांचे गॉडङ्गादर असणार्या शरद पवार यांनी या सोनिया गांधींशी भांडण करून, त्यांच्या पक्षातून बाहेर पडून स्वत:चा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष का स्थापन केला होता?
तो स्थापन केला तो केला पण स्थापन झाल्याबरोबर लगेच सत्तेची खुर्ची मिळण्याची आशा निर्माण होताच लगेच सोनिया गांधींना शरण जाण्याची भूमिका का घेतली? जितेंद्र आव्हाड यांना हे प्रश्न विचारल्याबरोबर हातातली पुस्तके सावरत घरी पळत परत यावे लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्तित्वाविषयी असाच मर्मग्राही प्रश्न विचारला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून १९९९ साली त्यांच्यापासून ङ्गारकत घेतली. नंतर मात्र हा मुद्दा आता राहिलेला नाही अशी भूमिका घेतली. त्या संबंधी दोन प्रश्न निर्माण होतात. मुळात सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा प्रश्न जर एक वर्षानंतर निरर्थक ठरणार होता तर दूरदृष्टीच्या शरद पवारांना ते आधी का कळले नाही? आणि नंतर सुद्धा ते कळले तरीही त्यांनी आपला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिल्लक का ठेवला आहे? पृथ्वीराज चव्हाण यांचा हा प्रश्न बिनतोड आहे. कारण शरद पवारांनी खरेच वर्षभरामध्ये असे घुमजाव केलेले होते. मात्र त्यांचे घुमजाव योग्य होते आणि ज्या कारणाने पक्ष स्थापन केला ते कारण उचित नव्हते तर त्यांनी आपला पक्ष बरखास्त करून कॉंग्रेसमध्ये यायला पाहिजे होते. परंतु पवारांचे राजकारण नेमके काय आणि कसे असते हे सर्वांना माहीत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा हेतू सङ्गल झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित करतानाच एक गोष्ट सांगितली आहे की, हेतू सङ्गल झाला नसेल तर शरद पवार यांनी कॉंग्रेसमध्ये परत यावे असे काही आपण म्हणणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या म्हणण्यामध्ये बरेच काही आहे. कारण तात्विकदृष्ट्या पवारांचा पक्ष बरखास्त करून कॉंग्रेसमध्ये येणे उचित असले तरी कॉंग्रेसमध्ये आलेले शरद पवार व्यवहारत: डोकेदुखी ठरणारे आहेत.
पवार जेव्हा कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा ते कॉंग्रेसमध्ये असून स्वत:चा स्वतंत्र गट कार्यरत ठेवत होते. कॉंग्रेसच्या संघटनेचे राजकारण एका बाजूला सुरू असायचे आणि पवारांच्या कारवाया वेगळ्याच दिशेने चाललेल्या असायच्या. पक्षाच्या शिस्तीला बांधून घेणे पवारांना मान्यच नसायचे. खरे म्हणजे पवारांच्या मध्ये मोठी क्षमता आहे. या क्षमतेमुळे आपण ङ्गार मोठे नेते होऊ शकतो असा त्यांचा दावा असतो आणि तो खोटा नाही. परंतु आपण पक्षात राहिलो तर पक्षाच्या शिस्तीत जेवढे मोठे होऊ शकतो तेवढेच मोठे होणे आपल्याला स्वीकारावे लागेल ही कल्पना त्यांना मान्य होत नाही. म्हणून ते पक्षात असतात तेव्हा स्वत:चे वेगळे प्रयत्न करतात आणि पक्षात नसतात तेव्हा आपल्या पक्षाच्या माध्यमातून वाटचाल करतात. या दोन्हींच्या मध्ये त्यांच्या राजकारणाची गोची झालेली आहे. आता येत्या पाच वर्षात त्यांचे राजकारण संपत आलेले असेल. तेव्हा त्यांनी कॉंग्रेसमध्ये न आलेलेच बरे, असे पृथ्वीराज चव्हाण यांना वाटत असणार. पवारांनी कितीही प्रयत्न केले तरीही आता ते पृथ्वीराज चव्हाण यांची बरोबरी करीत नाहीत कारण चव्हाणांनी सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचार केलेला नाही आणि शांंतपणे पण खंबीरपणे निर्णय घेऊन आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.