दलाई लामांच्या आवाजाला तिबेटवासिय मुकणार

तिबेटी धर्मगुरू आणि तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत असलेले दलाई लामा यांचा आवाजही आता तिबेटी जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी चीन सरकार प्रयत्नशील झाले असून तिबेटमध्ये त्यासंदर्भात अनेक निर्बंध लागू केले गेले आहेत. दलाई लामांना पाहू नये, त्यांचा आवाज ऐकू येऊ नये यासाठी तिबेटमध्ये इंटरनेट, टिव्ही अथवा अन्य तत्सम संचार माध्यमांवर बंदी घातली गेली असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही माध्यमातून दलाई लामांना प्रसिद्धी दिली जाऊ नये यासाठीही खास प्रयत्न केले जात आहेत.

तिबेटच्या बाहेरच्या देशातूनही दलाई लामांवर प्रसारित केले जात असलेले कार्यक्रम तिबेटमध्ये पाहता येऊ नयेत यासाठी चीन सरकार प्रयत्नशील आहेच. दलाई लामांसंबंधीची कोणतीही बातमी तिबेटवासियांपर्यंत पोहोचूच नये अशी खबरदारी घेतली जात आहे मात्र या कामी चीन सरकारला फारच थोडे यश मिळाले आहे.

तिबेटी जनता बेकायदेशीर सॅटेलाईट टिव्हीच्या माध्यमातून तसेच इंटरनेट बंदी मोडून व प्रसंगी शिक्षा भोगायची तयारी ठेवूनच दलाई लामांसंबंधीची सर्व माहिती मिळविण्याचे प्रयत्न करतात असेही आढळले आहे. फार मोठा धोका पत्करून तिबेटमध्ये दलाई लामांचे फोटो व पुस्तके स्मगलिग करून आणली जात असल्याचेही वृत्त आहे.