मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती भोवल्या

मुंबई- मुंबईतील अनेक दुकानांच्या पाट्या या मराठीतूनच असणे बंधनकारक असतानाही या पाट्यांवर मोबाइल कंपन्यांनी कब्जा केला आहे. पैशांच्या हव्यासापोटी दुकानदारांकडून मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती करतानाच महापालिकेचे नियमच पायदळी तुडवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा दुकानदारांविरोधात महापालिकेने धडक कारवाई हाती घेतली आहे.

मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती दुकानांच्या पाट्यांवर लावणार्‍या 217 दुकानदार आणि 197 प्रकरणांमध्ये मोबाइल कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली. मुंबईत अनधिकृतपणे जाहिराती लावणा-यांविरोधात महापालिकेच्या वतीने धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईतील अनेक दुकानांच्या पाट्यांवर लावण्यात आलेल्या मोबाइल कंपन्यांच्या 404 जाहिराती हटवण्यात आल्या आहेत.

मुंबईतील 24 विभाग कार्यालयांतर्गत दुकानांवर लावण्यात आलेल्या अशा जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी विभागीय वरिष्ठ निरीक्षकांना (परवाना) आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी ही कारवाई करून दुकानदार आणि मोबाइल कंपन्यांच्या विरोधात खटले दाखल केले आहेत.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना नगरसेविका आणि स्थापत्य समितीच्या (शहर) अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी दुकानांच्या पाट्यांवर मोबाइल कंपन्यांच्या जाहिराती करून महापालिकेचा कोटयवधी रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याची बाब निदर्शनास आणली होती. त्यामुळे अशा जाहिरातींबाबत शुल्क वसूल करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली होती.

या वेळी पेडणेकर यांनी लोअर परळ भागांमधील दुकानांवर लावलेल्या मोबाइल कंपन्यांच्या फलकांची छायाचित्रे काढून ती पुराव्यादाखल सादर केली होती. त्यामुळे याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वाचे लक्ष होते. परंतु प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतल्यामुळे अशाप्रकारे दुकानांच्या पाट्यांवर मोबाइल कंपन्यांचा प्रचार करणारे दुकानदार आणि मोबाइल कंपन्यांच्या अधिका-यांच्या उरात धडकी भरली आहे.