मुजफ्फरनगरमध्ये पुन्हा दंगल भडकली, तीन ठार

मुजफ्फरनगर – उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात आज, बुधवारी संध्याकाळी पुन्हा दंगल भडकली. यात दोन गटांत झालेल्या हिंसेत तीन तरुण ठार झाले असल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात येथे भीषण दंगल भडकली होती. त्यात एकूण 60 जण ठार झाले होते.

आज, बुधवारी संध्याकाळी जिल्ह्याच्या मुहम्मदपूर गावात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात अफरोज (20), मेहरबान (21) आणि अजमल (22) हे तीन तरुण ठार झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौशल राज यांनी दिली गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीमुळे या भागात अद्यापही तणाव कायम असून त्यातून आजची दंगल पेटली असण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दंगलखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तिघेही मृतक हे दंगलीनंतर गावाबाहेर उभारण्यात आलेल्या मदत छावणीत राहत होते.