पेरू देशात हमारा बजाज आघाडीवर

लॅटिन अमेरिकेच्या वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेत चीनने गुंतवणूकीत भारताच्या पेक्षा कितीतरी पुढची मजल गाठली असली तरी पेरू देशात मात्र चीनी गाड्यांना मागे सारत भारतीय बजाज कंपनीने आघाडी घेतली आहे. बजाजच्या तीन चाकी आणि पल्सर गाड्यांनी चीनच्या तिचाकी गाड्यांना कधीच मागे टाकले आहे. बजाजच्या तिनचाकी गाड्यांची महिन्याची विक्री २००० वर गेली असून पल्सर पेरू देशात टॉप सेलर गाडी ठरली आहे.

वास्तविक चीनच्या तिचाकी भारतीय तिचाकींपेक्षा स्वस्त आहेत. मात्र भारतीय कंपन्या तेथील स्थानिक कंपन्यांच्या विकासातही हातभार लावतात तसा चीनकडून लावला जात नाही असे भारताच्या राजदूत मनप्रित व्होरा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या बजाजबरोबरच टीव्हीएस च्या गाड्यांनाही येथे चांगली मागणी आहे. तसेच येथील समृद्ध निसर्ग संपदा आणि खनिजे यामुळे भारतातील आठ कंपन्यांनीही येथील खाण क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.

भारतानेही गेल्या पाच महिन्यात पेरूकडून २०० दशलक्ष डॉलर्सची सोनेखरेदी केली असून त्यामुळे या दोन देशातील व्यापारात पहिल्या चार महिन्यातच तब्बल ४४ टक्के वाढ झाली आहे.