जगातील सर्वात उंच माणूस विवाहबद्ध

जगातील सर्वात उंच माणूस म्हणून २००९ साली गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेला तुर्कस्तानचा सुलतान कोरेन रविवारी त्याची प्रेमिका मर्व्हे दिबो हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. ३० वर्षीय कोरेनची उंची ८ फूट ३ इंच असून त्याची पत्नी ५ फूट ८ इंच उंचीची आहे. तरीही ती त्याच्या कमरेपर्यंतच पोहोचू शकते. सुलतान व्यवसायाने शेतकरी असून त्याला कांही दुर्घर आजार झाला आणि तेव्हापासून त्याची उंची वाढू लागली. ती २०११ साली वाढायची थांबली असे समजते.

बरेच दिवस सुलतान योग्य वधूच्या शोधात होता पण मनासारखी मुलगीच त्याला मिळत नव्हती. अखेर त्याची आणि दिबोची गाठ पडली आणि त्याचे रूपांतर प्रथम प्रेमात व नंतर विवाहबंधनात झाले. सुलतान सांगतो दिबो मला हवी तशी आहे. मी विवाहासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केली मात्र त्याचे चीज झाले कारण मला दिबो मिळाली. मी खूप आनंदात आहे. आता माझे स्वतःचे कुटुंब असेल. दिबोला ठिकठिकाणी फिरवता यावे यासाठी सुलतान आता तो मावू शकेल अशी गाडी खरेदी करण्याच्या विचारात आहे.

या उंचीपायी सुलतानने अनेक अडचणी सोसल्या आहेत. सर्वसामान्य माणसे वापरतात तसे कपडे, चप्पल, झोपण्याची कॉट तो वापरू शकत नाही. त्याच्या चप्पलचा साईज २८ नंबरचा आहे. अर्थात जगातील सर्वात उंच माणूस म्हणून यापूर्वी इलिनाईस येथील वाडलो या माणसाच्या नावाची नोंद आहे. त्याची उंची ८ फूट ११ इंच इतकी होती. मात्र त्याचे १९४० सालीच निधन झाले आहे.

Leave a Comment