ओमन चंडी यांच्या हत्येचा प्रयत्न होता

कोझिकोडे – गेल्या शनिवारी केरळाचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्यावर झालेली दगडङ्गेक ही त्यांच्या हत्येचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केली गेली होती, असे कन्नूरच्या पोलिसांनी आपल्या लेखी अहवालात म्हटले आहे. कन्नूर हा डाव्या पक्षांचा बालेकिल्ला आहे. या शहरात दौर्‍यावर आले असताना ओमन चंडी यांच्या कारवर दगडङ्गेक झाली. तिच्यात ते जखमी झाले. या संबंधात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून घेतली आहे.

या आरोपींना कन्नूरच्या न्यायालयात उभे करण्यात आले तेव्हा पोलिसांची बाजू मांडताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या अहवालामध्ये आरोपींचा हेतू मुख्यमंत्र्यांची हत्या करण्याचा होता असे म्हटले आहे. कारण या १५ आरोपींनी केवळ दगडङ्गेक केली असे वरकरणी दिसत असले तरी त्यांनी आपल्या सोबत लोखंडी कांबी आणल्या होत्या, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आमदार सी. कृष्णन् आणि के.के. नारायणन् या दोघांनी या हल्ल्याची योजना आखली होती असा पोलिसांचा आरोप आहे. या दोघांना आता अटक झाली नसली तरी त्यांच्याकडे पोलीस संशयित म्हणून पहात आहेत आणि त्यांच्या कटाचे पुरावे हाती येताच या आमदारांसह आणखी ११ जणांना अटक होण्याची शक्यता आहे.