उद्धव ठाकरे कुटुंबिय दोन वाघ दत्तक घेणार

मुंबई – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्राणी दत्तक योजनेत दोन वाघ दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र उद्यानाने जाहीर केलेल्या या योजनेला राज्य  शासनाकडून अद्यापी अंतिम मंजुरी मिळालेली नाही व त्यामुळे ठाकरे यांना आत्ताच वाघ दत्तक देता येत नाहीत असे उद्यान अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंबियांच्या एका निकटवर्तीयाने उद्यान अधिकार्‍यांशी संपर्क साधला होता व उद्धव यांना प्राणीदत्तक योजनेत दोन वाघ दत्तक घ्यायचे असल्याचे सांगितले होते. ठाकरे यांना वाघांचे प्रेम वाटणे यात नवल कांहीच नाही कारण त्यांच्या पक्षाचा लोगो गर्जणारा वाघ असाच आहे. उद्धव स्वत: वन्य प्राणी फोटोग‘ाफर आहेत शिवाय त्यांची दोन्ही मुले आदित्य व तेजस यांनाही वन्यप्राण्यांबद्दल प्रेम व आवड आहे. अशा प्रकारे प्राणी दत्तक योजनेत राजकीय व्यक्ती पुढे आल्या तर सर्वसामान्यंात चांगला मेसेज जाईल असा उद्यान अधिकार्‍यांना विश्वास वाटतो आहे.

उद्यान प्रमुख संचालक सुनील लिमये म्हणाले की अन्य एका आंतरराष्ट्रीय शाळेकडूनही सिंह दत्तक घेण्यासाठीचा प्रस्ताव आला आहे. आम्ही या योजनेसाठी दोन महिन्यांपूर्वीच शासनाची परवानगी मागितली आहे मात्र ती अजून मिळालेली नाही. प्राणी दत्तक योजनेत 50 ते 60 प्राणी उपलब्ध असून त्यांच्या जेवणाचा, देखभाल व औषधोपचाराचा खर्च पालकांनी करावयाचा आहे. त्यानुसार वाघांसाठी दरवर्षी 3 लाख 5 हजार, सिंहासाठी 2 लाख 55 हजार, बिबट्यासाठी 1 लाख 15 हजार, चितळासाठी 20 हजार, नीलगाईसाठी 30 हजार, बार्किंग डिअरसाठी 10 हजार तर पांढर्‍या वाघासाठी 3 लाख 15 हजार असा वार्षिक खर्च आहे. त्यात दत्तक पालकांना आपल्या दत्तक बछड्याला महिन्यातून एकदा भेटता येणार आहे तसेच दत्तक पालकाचे नांव संबंधित प्राण्याच्या पिंजर्‍यावर लावले जाणार आहे.

शासनाकडून या योजनेला मंजुरी येताच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला जाईल असे अन्य अधिकार्‍याने सांगितले.

Leave a Comment