जागावाटपाचा झगडा

शरद पवार यांची ङ्गार पूर्वी एक ख्याती होती की, ते ज्या पक्षाशी युती करतात तो पक्ष कमकुवत होतो. पण महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाच्या बाबतीत असे काही घडले नाही. पवारांच्या ख्यातीला अपवाद ठरला. पवारांनी आपल्या या मित्र पक्षाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला नाही असे काही नाही. १५ वर्षे मैत्री तर आहे पण आतून मित्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न जारी आहे असा प्रकार सुरू राहिला. या संघर्षाची सूत्रे आणि प्रकार आता सर्वांना पाठ झाली आहेत. हे दोन पक्ष आपापसात भांडतील पण त्या भांडणातून युती मोडणार नाहीत आणि सत्ताही सोडणार नाहीत हे आता सर्वांना कळूनही चुकले आहे. आता पवारांनी
राहुल गांधी यांच्या विरोधात बॉंब तर टाकला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे अवघड आहे असे म्हटले पण त्यांच्या पक्षाशी असलेली युती तोडणार नाही असेही स्पष्ट केले. पवार एका बाजूला राहुल गांधी यांना नाकारत आहेत पण दुसर्‍याच क्षणाला आपण कॉंग्रेसला अंतर देणार नाही असेेही जाहीर करीत आहेत. त्यांना कॉंग्रेसच्या सोबत तर रहायचे आहे पण कॉंग्रेसशी जमतही नाही कारण त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून जादा जागा हव्या आहेत. जागा वाटपाचा ङ्गॉर्म्युला काय असावा यावर हा सारा वाद आहे आणि वेळोवेळी काढली जाणारी खोडी या सूत्रासाठीच काढली जात आहे.

निवडणुका जवळ आल्या की पवार काही तरी कळ काढतात. पक्षातल्या कोणाला तरी स्वबळावर निवडणूक लढवण्याची आवई ठोकायला लावतात आणि मग सवाल जबाब होत राहतो. शेवटी मनाप्रमाणे जागावाटप झाले की, दोन्ही पक्ष हातात हात घालून निवडणूक लढवतात. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे या दोन पक्षातली ती नेहमीची खिंचाताण तीव्र होत चालली आहे. या दोन पक्षामध्ये १९९९ पासून आघाडी झालेली आहे. परंतु सुरूवातीपासूनच यांच्यामध्ये इतरही अनेक कारणांवरून सतत कलगीतुरा होतो, परस्पर विरोधी वक्तव्ये केली जातात. आता या दोन पक्षामध्ये असलेली युती तुटणार की काय असे वाटण्या इतपत त्यांच्यात कटुता निर्माण होतेे. परंतु ही युती दोघांच्याही ङ्गायद्याची आहे हे त्यांच्या लक्षात येते आणि शेवटी या ङ्गायद्याचा विचार करून हे दोन पक्ष आघाडी टिकवतात. काय करणार ? जातीयवादी शक्तींना रोखले पाहिजे ना ? गेल्या १५ वर्षापासून हा प्रकार चालला आहे. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे थोड्या वेगळ्या स्वरूपात या हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला ङ्गारसे भवितव्य नाही त्यामुळे राष्ट्रवादीला ङ्गार जागा सोडू नयेत असा विचार प्रवाह कॉंग्रेसमधून वाहत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिकाधिक जागा मिळाव्यात असा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी पवारांनी सारे राजकारण, डावपेच आणि दबावतंत्र या सगळ्या गोष्टी पणाला लावल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यातल्या २६ जागा कॉंग्रेसने आणि २२ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढवाव्यात असा सर्वसाधारण समझोता झालेला आहे आणि तोच अंतिम होण्याची शक्यता आहे. परंतु दबावतंत्राचा वापर उभय बाजूंनी सुरू आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी हळूच राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवावी असा विचार पुढे केला आहे. सध्या राज्यात कॉंग्रेसकडे १८ आणि राष्ट्रवादीकडे ८ जागा आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसपेक्षा ङ्गार मागे आहे. पर्यायाने त्यांना लोकसभेच्या ङ्गार तर १९ जागा सोडाव्यात असा विचार कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादीला ‘कट टू साईज’ केले तर कॉंग्रेसला तब्बल २९ जागा लढवायला मिळतात. आंध्र प्रदेश हातून चाललेला आहे. अशा वेळी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तर केंद्रातल्या सत्ताग्रहणाला महाराष्ट्राचा मोठा हातभार लागेल. असा कॉंग्रेसच्या नेत्यांचा विश्‍वास आहे. त्यातूनच जागा वाटपाच्या सूत्राबाबत अंतर्गत धुसङ्गुस चाललेली आहे. राहुल गांधी नुकतेच पुण्यात येऊन गेले तेव्हा असा विचार झाला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दादागिरीला कॉंग्रेसने काही तरी उत्तर दिले पाहिजे, वेळ पडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती न करता निवडणूक लढवली पाहिजे असे त्यांना कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आवाहन केले. मात्र राहुल गांधी यांनी या नेत्यांच्या विचाराला खो दिला. राष्ट्रवादीला वगळून निवडणूक लढवण्याची आपली संघटनात्मक ताकद आहे का, असा प्रश्‍न विचारून राहुल गांधी यांनी या नेत्यांना निरुत्तर केले. राहुल गांधी यांचे हे म्हणणे काही चूक नाही. कारण महाराष्ट्रात एकट्याने निवडणूक लढवून ङ्गार जागा मिळवण्याची आपली ताकद नाही हे कॉंग्रेसच्या नेत्यांना माहीत आहे. ताकद नसली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसला कमी जागा द्याव्यात आणि त्यांना त्यांची जागा दाखवावी अशी खुमखुमी मात्र कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. तिला प्रत्युत्तर म्हणून शरद पवार कॉंग्रेसला टोले लगावत आहेत. पण पुढे चालून खरोखरच आघाडी सरकार सत्तेवर आले तर राहुल गांधी पंतप्रधान होता कामा नयेत या मुद्यावरून शरद पवार कॉंग्रेसशी युती तोडणार आहेत का? किंबहुना आजच शरद पवार आपण कॉंग्रेसशी युती तोडणार नाही असे म्हणत आहेत. एकंदरीत युती तोडायची नाही पण खुसपटे काढत राहायचे असा पवारांचा पवित्रा आहे.