अमेरिकन हेरगिरीची चिंता नको- पंतप्रधान

नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मोबाईल फोन नाही किंवा ते मेल पाठवण्यासाठी वैयक्तीक ई-मेल खात्याचा वापर करत नाही त्यामुळे अमेरिकेच्या हेरगिरीची चिंता करण्याचे कारण नाही असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने 35 जागतिक नेत्यांच्या दूरध्वनी संभाषणाची हेरगिरी केल्याचे वृत्त गार्डीयन वर्तमानपत्राने दिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाला हेरगिरीच्या धोक्याविषयी विचारले असता, प्रवक्त्याने सांगितले कि, पंतप्रधान मनमोहन सिंग मोबाईल फोन वापरत नाहीत तसेच त्यांचे ई-मेल खातेही नाही त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.

पंतप्रधान कार्यालयाकडून ई-मेलचा वापर होतो मात्र पंतप्रधानांचे वैयक्तीक ई-मेल खाते नाही. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने 35 जागतिक नेत्यांच्या दूरध्वनी संभाषणाची हेरगिरी केल्याचा दावा गार्डीयनने केला आहे. व्हाईट व्हाऊस आणि पेंटागॉनकडून नंबर उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर ही हेरगिरी करण्यात आली. सीआयएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेनने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे गार्डीयनने हा दावा केला आहे.

स्नोडेनने यापूर्वीच अमेरिकेच्या हेरगिरीच्या योजना उघड करुन, अमेरिकेला अडचणीत आणले आहे. जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांच्या दूरध्वनी संभाषणाची हेरगिरी झाल्याचा संशय असून, जर्मनी आणि फ्रान्स या देशांनी अमेरिकेच्या या हेरगिरीचा निषेध नोंदवला आहे.