बिहार भाजपाच्या मागे आयकर खात्याचा ससेमिरा

पाटणा – भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील हिरे व्यापार्‍यांनी सत्कार केला. तो सत्कार संपताच आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी या व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या. या सत्कार समारंभात बोलतानाच मोदी यांनी या व्यापार्‍यांना, आयकर खात्याचे अधिकारी सतावतील असे म्हटलेच होते आणि ते खरे ठरले. असाच प्रकार आता बिहारमध्ये सुरू आहे.

नरेंद्र मोदी यांची पाटण्यामध्ये पुढच्या आठवड्यात हुंकार रॅली होणार आहे. तिचे भव्य आयोजन सत्ताधारी पक्षाच्या एवढे डोळ्यावर आले आहे की, आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना या सत्ताधारी नेत्यांनी रॅलीच्या आयोजकांना त्रस्त करण्याची सूचना दिली आहे. आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी या सूचनेनुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांवर नोटीसा बजावल्या असून या रॅलीचे पैसे कोठून आणले याचा जाब विचारला आहे.

या कार्यक्रमाचा मंडप टाकणार्‍या कंत्राटदारांना किती पैसे दिले आणि ते देताना आयकर कापून घेतला की नाही, असे या नोटिसीत विचारले आहे. या कार्यक्रमात ध्वनिवर्धक किती लावणार, विजेची सोय कशातून करणार, पोस्टर्स किती लावणार, डिजीटल ङ्गलकांचा खर्च कशातून करणार याबाबतही विचारणा या अधिकार्‍यांनी केली आहे. या प्रश्‍नाच्या अनुरोधाने भाजपाच्या नेत्यांनी दिलेली माहिती खरी आहे का, हे ताडून पाहण्यासाठी आयकर खात्याने एक वेगळी यंत्रणा निर्माण केली आहे.

ही हुंकार रॅली ऐतिहासिक ठरावी यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार बसगाड्या नोंदल्या आहेत आणि ११ स्वतंत्र रेल्वे गाड्या बुक केल्या आहेत. या रॅलीला किमान दहा लाख लोक जमावेत असा निर्धार आहे आणि त्यामुळे केंद्रातील कॉंग्रेसचे नेते आणि बिहारमधले संयुक्त जनता दलाचे नेते हादरले आहेत.