तामिळनाडू सरकारला हवे आहेत ४०० किलो सोने

चेन्नई – तामिळनाडूच्या सरकारने सोन्याचा शोध सुरू केला आहे. मात्र हा शोध उत्तर प्रदेशातल्या उन्नावप्रमाणे उत्खनन करून सुरू केलेला नाही, तर सोन्याचा पुरवठा करणार्‍यांसाठी निविदा सूचना जारी केली आहे. सरकारने ४०० किलो सोने १२० कोटी रुपयांत पुरविणार्‍यांसाठी निविदा मागवल्या आहेत. राज्य सरकारच्या समाज कल्याण संचालनालयाला हे सोने हवे आहे. २२ कॅरेट सोन्याच्या चार ग्राम वजनाच्या एक लाख नाण्यांच्या स्वरूपात हे सोने सरकारने खरेदी करायचे ठरवले आहे.

राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या असून त्यातल्या काही योजनांमध्ये गरीब लोकांना सरकारतर्ङ्गे सोन्याचे नाणे देण्याची तरतूद आहे आणि त्यासाठीही एक लाख नाणी हवी आहेत. निविदा सूचना २४ नोव्हेंबरपर्यंत भरून पाठवायच्या आहेत. सरकारची निविदा भरायला कोणी तयार नाही, कारण केंद्र सरकारने सोन्यावर भरपूर नियंत्रणे लादली आहेत.

राज्य सरकारच्या निविदेत ४०० किलो सोने मागितले आहे. परंतु हे सोने आयात करावे लागणार आहे आणि केंद्र सरकारने आयातीवर निर्बंध घालताना जेवढे सोने आयात केले जाते तेवढ्याच सोन्याचे दागिने निर्यात केले पाहिजे अशी सक्त सूचना दिलेली आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीने एवढे सोने पुरवायचे ठरवले तर त्याला ४०० किलो वजनाच्या सोन्याचे दागिने निर्यात करावे लागतील. काही लोक या सोन्याचा पुरवठा करण्यास उत्सुक आहेत, मात्र त्यांच्यासमोर या अडचणी येत आहेत.

Leave a Comment