बंगळूर – सध्या आकाशाला भिडलेले कांद्याचे दर आणखी दोन ते तीन आठवडे तसेच राहतील आणि नंतर ते कमी व्हायला लागतील, असे कृषी मंत्री शरद पवार यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीमध्ये अत्यावश्यक सेवा कायदा लागू करावा का, असा प्रश्न विचारला असता श्री. पवार यांनी तसे उत्तर दिले आणि कायदा लागू करण्याची आवश्यकता नाही, भाव तीन आठवड्यात कमी व्हायला लागतील असे त्यांनी सांगितले.
कांद्याचे भाव ताबडतोब कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्यासाठी परदेशातून कांदा आयात करावा लागणार आहे. सुदैवाने चीन आणि इजिप्तमध्ये सध्या तरी भरपूर कांदा उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा कांदा आहे. तेव्हा तो आयात केला तर देशांतर्गत कांद्याचे भाव कमी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित कांद्याच्या वाढत्या भावामुळे अस्वस्थ झाल्या आहेत आणि त्यांनी काल दिल्लीतल्या कांदा व्यापार्यांना साठेबाजी आणि नङ्गेखोरी न करण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु उत्तरांचलातील पूर, नुकतेच येऊन गेलेले वादळ, त्याचबरोबर वादळा पाठोपाठ आलेला मुसळधार पाऊस यामुळे कांद्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.