सोन्यासाठीच्या खोदकामात मिळाल्या किंमती वस्तू

उन्नाव – उन्नावच्या डौडिया खेडा येथे सुरू असलेल्या खोदकामात अनेक ऐतिहासिक आणि किमती वस्तू पुरातत्व विभागाला मिळाल्या आहेत. 1000 टन सोन्याचा शोध घेणार्‍या पुरातत्व विभागाला भिंतीनंतर आता लाखेच्या बांगड्यांचे पाच तुकडे आणि मातीचे भांडे मिळाले आहेत. चौथ्या दिवशी किल्ल्याच्या परिसरात 48 सेंटीमीटर खोदकाम केलं गेलं.

चार दिवसांमध्ये आतापर्यंत 1.5 मीटर खोदकाम झालंय. एएसआयच्या टीमला दोन दिवसांपूर्वी जवळपास 1 मीटर रुंदीची भिंत सापडली. त्याआधारेच आता पुढचं खोदकाम सुरू आहे. तर काल दुपारी डौडिया खेडा येथे पोहोचलेले संत शोभन सरकारचे शिष्य ओम यांनी मीडियाला पुन्हा सांगितले की किल्ल्यातील खोदकामात 1000 टन सोने सापडेलच. त्यांनी पुरातत्व विभागाचा (जीएसआय) रिपोर्टही पत्रकारांना दाखवला.

बिघापूरचे एसडीएम विजय शंकर दुबेनं सोमवारी संध्याकाळी खोदकाम संपल्यानंतर सांगितले की, आज चौथ्या दिवशी 48 सेंटीमीटर खोदकाम झालं. खोदकामादरम्यान मातीची मोठी भट्टी मिळाली. या भट्टीवर खूप लोकांसाठी जेवण बनवले जात असल्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सध्या जिथे खोदकाम सुरू आहे. तिथे किचन आणि स्टोअर रूम असण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं सोने येथे लपवले गेले असल्याची शक्यता आहे.