महिंद्रा ग्रूपचा एक भाग असलेल्या महिंद्रा एरोस्पेस तर्फे येत्या दोन वर्षात भारतात पहिल्या आठ सीटर विमानाचे उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे महिंद्र सायस्टेचचे अध्यक्ष हेमंत लुथ्र यांनी जाहीर केले आहे. नरसापुरा येथील नवीन एरो स्ट्रक्चर उत्पादन प्रकल्पाचे उदघाटन करताना ते बोलत होते.
महिद्रातर्फे सध्या आठ सीटर जीए-८ युटिलिटी एअरक्राफटचे उत्पादन सुरू आहे मात्र ते ऑस्ट्रेलियातील एरोस्टाफ आणि ग्रिप्स एरो या अधिग्रहित केलेल्या कंपन्यांमध्ये केले जात आहे. विमान क्षेत्रात उतरण्यासाठी या दोन्ही कंपन्यांचे महिद्राने २०१० साली अधिग्रहण केले होते. आत्तापर्यंत ऑस्टेलियातील कारखान्यातून कंपनीने २५० विमाने निर्यात केली असून त्यांचा वापर कॅनडा, यूएस, युरोपमधील देशात पर्यटन, मदत कार्यासाठी, साहसी क्रीडा प्रकारांसाठी केला जात आहे. कंपनी जीए १८ हे मोठे विमान विकसित करण्याच्याही प्रयत्नात आहे.
याच कार्यक्रमात बोलताना कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले की भारताची आजची विमान व्यवसायातील ओळख जागतिक ग्राहक अशी आहे ती बदलून जागतिक उत्पादक अशी करण्याची कंपनीची मनीषा आहे. विमान उत्पादनाचा प्रयत्न हे त्यातील पहिले पाऊल आहे. भारतातील ही पहिली खासगी क्षेत्रातील एरोस्ट्रक्चर र्फसिलिटी आहे. ही युटिलिटी विमाने दुर्गम भागातही सहज उतरविता येतात असेही त्यांनी सांगितले.