गांधीच्या साठ दुर्मिळ वस्तूंचा युकेत होतोय लिलाव

पुणे –  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना राष्ट्रपिता म.गांधी यांनी जो चरखा वापरला होता, त्या चरख्यासह गांधींच्या साठ दुर्मिळ वस्तूंचा लिलाव ५ नोव्हेंबरला यूकेत मुलॉक्स ऑक्शनतर्फे केला जात आहे. गांधींच्या चरख्यालाच या लिलावात ६० ते ८० हजार पौंडांची बोली मिळेल असा विश्वास वेस्टवूड बुक या ऑक्शनरने व्यक्त केला आहे.

गांधींनी हा चरखा अमेरिकन मिशनरी फ्लॉईड पफर यांना भेट म्हणून दिला होता. भारतीय शिक्षण व औद्यागिक सहकारातील पायोनियर म्हणून फ्लॉइड ओळखले जातात.पफर यांनी लावलेल्या बांबूच्या नांगराचा शोध गांधीजींनी स्वीकारला होता आणि भारतीय शेतकर्याेच्या जीवनात त्यांनी या शोधाने दिलेल्या योगदानाची परतफेड म्हणून हा चरखा त्यांना भेट दिला होता. पारंपारित चरखा बोजड व फिरविण्यास अवघड असतो मात्र हा चरखा हलका, फोल्ड करता येणारा आणि कुठेही वाहून नेण्यासाठी हँडलची सोय असलेला असा आहे. गांधीजींच्या मालकीच्या ज्या कांही वस्तू आहेत त्यात हा चरखा मौल्यवान मानला जातो.

अन्य वस्तूंमध्ये कांही महत्त्वाची कागदपत्रे, फोटो, पुस्तके अशा वस्तूंचा समावेश आहे. याच लिलावात टिपू सुलतानचे १९ व्या शतकातले चित्र, शिख व म्हैसूर राज्यांशी संबंधित कांही एतिहासिक वस्तूंचाही लिलाव केला जाणार आहे.