चीन भेटीत सीमा प्रश्न केंद्रस्थानी- पंतप्रधान

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग पाच दिवसांच्या चीन आणि रशिया दौ-यावर रवाना झाले आहेत. संरक्षण सहकार्य आणि सीमा वाद सोडवण्याच्या दुष्टीने पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. पंतप्रधान आधी रशियाला जाणार आहेत तेथून ते चीनला प्रयाण करतील. चीन दौ-यात प्रस्तावित सीमा सहकार्य कराराला प्राधान्य देणार असल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत.

भारत आणि चीन दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव निर्माण होऊ नये तसेच सीमावादाचा मुद्दा परस्पर सामंजस्याने सोडवण्यासंबंधी काही महत्वाचे करार या दौ-यात होऊ शकतात. भारत आणि चीनमध्ये अनेक वर्षांपासून काही मुद्दे आहेत. दोघांच्या आपआपल्या चिंता आहेत. दोन्ही देश मैत्री आणि सहकार्याचे संबंध बिघडू न देता प्रामाणिकपणे आणि परिपक्वतेने हे विषय हाताळत आहेत असे पंतप्रधानांनी दौ-यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सीमेवर शांतता राखून सीमा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर कुडानकूलम अणूऊर्जा प्रकल्पासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. रशिया या प्रकल्पात दोन अणूभट्ट्या सुरु करणार आहे. 20 ते 22 ऑक्टोंबर दरम्यान पंतप्रधान रशियामध्ये असतील. 22 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान ते चीनमध्ये असतील.