अलाहाबाद – प्रियंका गांधी यांना ङ्गुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आग्रह करणारे पोस्टर लावल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या अलाहाबादच्या दोघा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे निवासस्थान असलेल्या आनंद भवन या इमारतीसमोर हे दोन कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत. या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना आग्रह करणारे पोस्टर तयार करताना त्यावर सोनिया गांधी आजारी असतात असा उल्लेख केला होता. तो उल्लेख पाच राज्यात होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेससाठी हानीकारक ठरू शकतो, म्हणून या दोन कार्यकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच खुद्द राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात घेतलेल्या प्रचार सभेमध्ये सोनिया गांधी आजारी असतात असे सांगितले. आपल्या मातोश्री सोनिया गांधी या आजारी असल्यामुळे अन्न सुरक्षा विधेयकाच्या मतदानासाठी संसदेत येऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना रडू कोसळले असे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या भाषणातून सोनिया गांधी आजारी असतात असा उल्लेख आला.
मतदारांच्या हृदयाला हात घालता यावा आणि त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून राहुल गांधींनी असा उल्लेख केला असला तरी त्यांच्या या उल्लेखाने उत्तर प्रदेशातल्या त्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला दुजोराच मिळत आहे. मग त्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असेल तर राहुल गांधींना काय म्हणणार, असा प्रश्न कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्भवला आहे.