भाजपकडून दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी हर्षवर्धन?

दिल्ली – येत्या चार डिसेंबरला दिल्ली विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकांत भाजपतर्फे हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले जाणार असल्याचे वृत्त आहे. अर्थात हर्षवर्धन यांच्या नावावर २१ आक्टोबर रोजी होत असलेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल असे भाजपतील अंतर्गत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप नेत्यांमधील दुफळी जगजाहीर आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदातूनच आठ महिन्यांपूर्वी म्हणजे १३ फेब्रुवारीला भाजपतील विरोधी गटाने विजय गोयल यांची दिल्ली युनिट अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती व तेच दिल्ली विधानसभेसाठी मुख्यमंत्री असतील असे सांगितले गेले होते. मात्र केंद्रीय नेतृत्त्वाने स्वच्छ प्रतिमा असलेले आणि पक्षातील सदस्यांशी सलोख्याचे संबंध असलेले हर्षवर्धन यांना प्रथम पसंती दिली आहे असे समजते.

अर्थात दिल्ली राज्य युनिटचे अध्यक्ष विजय गोयल यांनाही नाराज केले जाणार नाही. त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट दिले जाईल असेही या वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभेसाठी ४ डिसेंबरला होत असलेल्या मतदानात ११.५ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.