साई मंदिर, शिवसेना भवन उडवण्याची धमकी

शिर्डी- शिर्डीतले साई मंदिर तसेच मुंबईतले शिवसेना भवन उडवून देण्याची धमकी देणारे पत्र साई संस्थानाला मिळाले आहे. दिवाळीमध्ये ९ नोव्हेंबरला साईबाबा मंदिर उडवून देणार असल्याचे पत्र संस्थानाला मिळाले आहे. संस्थान प्रशासनाने हे पत्र जिल्हा पोलिसांकडे सोपवले आहे. शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अंत्यविधी झाला ती शिवाजी पार्कवरील जागा उडवण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे हे पत्र कोठून आले. कोणी पाठवले यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

शिर्डीतले साई मंदिर तसेच मुंबईतले शिवसेना भवन उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने या दोन्ही ठिकाणच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या भागातील नागरिाकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणची कसून चौकशी पोलिस करीत आहेत.