इलियानोर कॅटन हिला मॅन बुकर पुरस्कार

लंडन – जगात मानाचा समजला जाणारा मॅन बुकर प्राईज हा साहित्यविषयक पुरस्कार २०१३ या वर्षासाठी न्यूझीलंडची लेखिका इलियानोर कॅटन हिला जाहीर झाला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. यंदा तो २८ वर्षे वयाच्या या लेखिकेला जाहीर झाला असून ती या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांमध्ये सर्वात तरुण लेखिका ठरली आहे. इलियानोर कॅटन हिने लिहिलेल्या ‘ल्यूमिनरीज्’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

इलियानोर कॅटन हिने आपली ही ८४८ पानांची कादंबरी १८६६ सालच्या न्यूझीलंडमधील काही घटनांवर लिहिलेली आहे. त्या काळात न्यूझीलंडमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या होत्या आणि बाहेरच्या देशातले अनेक लोक तिथे येऊन सोने उकरून काढून आपले नशीब आजमावत होते. त्या काळावर ही कादंबरी लिहिलेली आहे. वॉल्टर मुडी या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या घटना या कादंबरीत शब्दांकित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक गूढ गुन्हेगारीविषयक घटनांचाही समावेश आहे.

या पुरस्कारासाठी मूळ भारतीय असलेल्या झुंपा लाहिरी हिच्यासह सहा लेखकांचे नामांकन आले होते. मात्र त्यांच्यातून इलियानोर कॅटन हिची निवड झाली. हा पुरस्कार जिंकणारी इलियानोर ही दुसरी न्यूझीलंडची लेखिका ठरली आहे. तिला जाहीर झालेला हा पुरस्कार ५० हजार पौंडांचा आहे. तिला हा पुरस्कार मिळाल्याने जागतिक मान्यता तर मिळेलच पण तिच्या पुस्तकांचा खप वेगाने वाढेल.