अलाहाबाद – प्रियंका गांधी-वड्रा या सक्रिय राजकारणात असणार नाहीत आणि देशभरात प्रचार करणार नाहीत असे खुलासे कॉंग्रेसतर्फे केले जात असले तरी कॉंग्रेसच्या एका गटाकडून मात्र त्यांना निवडणुकीला उभे करण्याचा आग्रह केला जात आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या जिल्हा कॉंग्रेस कमिटीने ठराव मंजूर करून प्रियंका गांधी-वड्रा यांना फुलपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. प्रियंका गांधी यांचे पणजोबा आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा मतदारसंघ होता.
अलाहाबादमध्ये प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीच्या मागणीची भित्तीपत्रके लागली आहेत. त्यामध्ये प्रियंका गांधी यांचे मोठे चित्र छापण्यात आले असून, ‘मैय्या रहती बिमार, भैय्यापर बड गया भार’ असा मजकूर लिहिलेला आहे. सोनिया गांधी या आजारी असतात आणि राहुल गांधी यांच्यावरचा भार वाढलेला आहे, त्यामुळे प्रियंका गांधी यांना जबाबदारी देणे आवश्यक असल्याचे या भित्तीपत्रकातून सूचित करण्यात आले आहे.
अलाहाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव हसीम अहमद यांनी या घोषणेमागचा अर्थ स्पष्ट केला. आपल्या कमिटीने या मागणीचा ठराव एकमुखाने मंजूर केला आहे असे ते म्हणाले. पंडित नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघातून जिंकल्या होत्या. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी १९६७ साली याच मतदारसंघात विजय मिळवला होता. आता प्रियंका गांधी यांनी या मतदारसंघात उभे रहावे असा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
सोनिया गांधी आजारी पडल्यापासून त्यांचा रायबरेली मतदारसंघात प्रियंका गांधी या अधिक सक्रिय झाल्या आहेत. रायबरेलीच्या मतदारांना त्या दर आठवड्याला एकदा दिल्लीत भेटत असतात. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी या मतदारसंघात प्रचार सुद्धा केलेला होता. त्यात सोनिया गांधी विजयी झाल्या. मात्र २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रायबरेली मतदार संघाशी निगडित असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघात अतिशय आक्रमकपणे प्रचार करून सुद्धा त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती.