शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं नॉट रिचेबल

मुंबई- दसरा मेळाव्यातील व्यासपीठावरून अपमानस्पदरित्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींना जावे लागले. सोमवार सकाळीपासून जोशी सर कुठे गेलेत याचा पत्ता नाही. नाराज जोशी पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे. ते सेनेला जय महाराष्ट्र करणार का, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र सध्या तर ते बंड करण्याच्या विचारात नसल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात ती कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठे गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही. सोमवारी सकाळी ते दादरच्या ओशियाना निवासस्थानातून पत्नीसह बाहेर निघाले. आपल्या गावी नांदवीला जोशी सर जात असल्याची माहिती जोशींच्या निकटवर्तियांनी दिली. परंतु ते गावी गेले नसल्याने ते नेमके कुठं आहेत, याचा पत्ता कार्यकर्त्यांनाही नव्हता.

त्यामुळे मनोहर जोशी गेले कुणीकडे, अशी चर्चा रंगली आहे. मनोहर जोशी शिवसेना सोडणार का, शिवसेना सोडली तर ते कोणत्या पक्षात जातील आणि त्यांची पुढची राजकीय कारकिर्द कशी असेल, याबाबत नानाविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर केलेली टीका मनोहर जोशींच्या चांगलीच अंगलट आल्यानचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात ती कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.