प्रियंकांच्या चर्चेची अडचण

कॉंग्रेस पक्षात आता सर्वात चिंतेचा विषय नरेन्द्र मोदी हाच झाला आहे. मोदी यांच्या प्रभावाला शह देणारा कोण नेता पक्षात आता पुढे आणावा असा प्रश्‍न त्यांना पडला आहेच पण तसा एकही नेता नसल्याने ते निराश होत आहेत. नेते निराश असले तरीही काही कार्यकर्त्यांना तेवढी निराशा आलेली नाही. त्यांना अजूनही असे वाटते की, प्रियंका गांधी यांना नेतृत्व दिले तर त्या नरेन्द्र मोदी यांना निष्प्रभ करून टाकतील. काल कोठून कोण जाणे पण प्रियंका वड्रा (गांधी ) या पूर्ण देशात कॉंग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार अशी चर्चाही सुरू झाली. ही चर्चा कॉंग्रेस पक्षाच्या हिताची नाही त्यामुळे कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी या चर्चेचे खंडण केले. पण ते करता करता ही अफवा भारतीय जनता पार्टीने पसरवली असल्याचा आरोप केला. तशी शक्यता नाकारता येत नाही पण या गोष्टीतून कितीतरी गोष्टींवर प्रकाश पडला. प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या पूर्ण देशातल्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व करावे असे कॉंग्रेस पक्षातल्याच काही लोकांना वाटते. कारण त्यांना आता राहुल गांधी पक्षाला विजय मिळवून देतील असा भरवसा राहिलेला नाही. कॉंग्रेस पक्षाने सतत नवा चेहरा दिलेला आहे असे या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे असते. तसा राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी नवा आहे पण राजकारणात तो नवा तर नाहीच पण जुना आणि अयशस्वी ठरलेला आहे.

म्हणून काही कॉंग्रेस नेतेच अधुन मधुन प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाची मागणी करीत असतात. तशा प्रियंका गांधी याही काही फार मोठ्या विद्वान नाहीत. त्यांची क्षमताही जेमतेमच आहे पण काही लोकांना त्यांच्यात इंदिरा गांधी दिसतात. इंदिरा गांधी अशाच सडपातळ होत्या आणि त्यांच्या चेहर्‍यावर जसे निश्‍चयाचे तेज होते तसे प्रियंका गांधी यांच्यात आहे असा भास अनेक कॉंग्रेस नेत्यांना होत असतो. त्यामुळे काही लोकांना त्यांनी नेतृत्व करावे असे वाटते. मात्र तसे करणे कॉंग्रेस पक्षासाठी गैरसोयीचे आहे. १० वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांच्या हातून नेतृत्वाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता. तेव्हा स्वत: सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या बाजूने कौल दिला. प्रियंका आणि राहुल यांच्यात राहुल गांधी हे सरस असल्याची त्यांची खात्री पटली होती म्हणून त्यांनी राहुलच्या बाजूने कौल दिला. अर्थात राहुल गांधी यांच्या क्षमतेचा किती उजेड पडत आहे हे आपण पहातच आहोत मग प्रियंका यांची क्षमता तेवढीही नसेल तर त्यांच्या नेतृत्वाने काय प्रकाश पडणार आहे याचा अंदाज येऊ शकतो. तसा तो कॉंग्रेसच्या नेत्यांना येत असावा म्हणून त्यांनी प्रियंका यांच्या नेतृत्वाची कल्पना हाणून पाडली.

एवढेच नाही तर त्यांना प्रियंका वड्रा यांचा काही उपयोग होणार नाही याची खात्रीच आहे असे दिसते. प्रियंकाच्या समर्थकांना मात्र प्रियंका या नरेन्द्र मोदी यांचा प्रभाव कमी करू शकतील असा विश्‍वास वाटतो. प्रियंका गांधी यांना जवळून पाहणारे मात्र याबाबत फार साशंक आहेत. आता या क्षणाला प्रियंका गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणे याचा अर्थ राहुल गांधी यांचे नेतृत्व नाकारणे असा होईल. प्रियंका यांना पुढे केले आहे याचा अर्थ कॉंग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्यावर विश्‍वास राहिलेला नाही असा झाला तर राहुल गांधी यांचेही नेतृत्व मागे पडेल आणि प्रियंका गांधी यांचेही नेतृत्व पुरेशा क्षमतेने पुढे आले नाही तर कॉंग्रेस पक्ष गांधी घराण्याशिवाय निवडणुकीत उतरून पराभूत होईल. तेव्हा निवडणुका जवळ आल्या असताना असा प्रयोग करण्यात आणि धरसोड करण्यात काही मतलब नाही. या प्रयोगात कॉंग्रेसला बरेच काही गमवावे लागेल. कारण प्रियंका गांधी यांनी नेतृत्व स्वीकारले तरीही त्यांना पराभूत करण्याची व्यवस्था त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी करून ठेवली आहे. त्यांच्या नावावर अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चिठ्ठी फाटलेली आहे. प्रियंका पुढे होताच ही सारे प्रकरणे मोठ्या प्रमाणावर पुढे आणली जातील.

प्रियंका गांधी यांच्या नावावर चर्चा सुरू होताच पक्षाचे प्रवक्ते अजय माकन हे पत्रकारांवर उखडले आणि त्यांनी अद्वातद्वा बोलून प्रियंका गांधी या नेतृत्व करणार नाहीत असे निक्षुन सांगितले. पण त्यांनी ज्या त्वेषाने हा खुलासा केला तो त्वेष पाहिला असता त्यांना प्रियंका गांधी या किती नकोशा आहेत याचा बोध होतो. पक्षाचे धोरण म्हणाल तर प्रियंका गांधी या नेतृत्व करणार नाहीत पण पक्षाच्या एका गटाला किंवा पक्षातल्या काही कार्यकर्त्यांना प्रियंंका गांधी हव्या आहेत हे काही नाकारता येत नाही. तशा त्या हव्या आहेत हीच तर पक्षाची खरी अडचण आहे. या अडचणीत सापडलेले पक्ष प्रवक्ते त्यामुळेच चिडले आहेत. आता प्रियंका गांधी या नेत्या होओत की न होओत पण त्यांच्या नावाचा जो काही प्रचार व्हायचा होता तो आता झाला आहे आणि पक्षातला एक गट राहुल गांधी यांच्या क्षमतेवरून त्यांंच्यावर नाराज असल्याचे समोर आले आहे. ही स्थिती मोठीच विचित्र झाली आहे. प्रियंका गांधी यांना नेतृत्व मिळणार नाही हे खरे पण त्यांच्या नावाचा पुकारा झाला आहे आणि त्यांच्या मुळे जे काही नुकसान होणार होते ते काही प्रमाणात का होईना पण झाले आहे.