ओझर – नाशिकमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्याचं नाशिककरांचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. नाशिकजवळच्या ओझर विमानतळाच्या इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. जानेवारीपासून ओझरमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ड्रिमलायनर विमानांची लँडिग आणि टेकऑफचीही चाचणी इथे नुकतीच यशस्वी झाली.
नाशिकहुन सुरू होणारी विमानसेवा म्हणजे नाशिककरांसाठी आतापर्यंत विनोदाचा विषय होता. अनियमित उड्डाणं, विमानाच्या चुकीच्या वेळा, विमानतळापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ आणि तेथे होणारी हेळसांड, यामुळे नाशिकला विमानसेवा कधी रूजलीच नाही. मात्र एचएएलच्या ऐवजी एअरपोर्ट अॅथोरीटीनं यासेवेत लक्ष घातलं तर विमानसेवा अधिक सुरळीत होईल हे लक्षात घेत जिल्हा प्रशासन आणि पीड्ब्यूडीनं एचएलएलच्याच जागेत विमानातळाची अत्याधुनिक सुविधांची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी पुढाकार घेतला.
तब्बल 71 कोटी रूपये खर्च करून अशी नवी इमारत उभी राहात आहे. या सुसज्ज अशा इन्फ्रास्ट्रक्चरमुळे मुंबई विमानतळाचा ताण हलका होउ शकतो असं तज्ञांना वाटत आहे. या विमानतळाच्या निर्मितीसाठी जवळपास साडेसहाशे कर्मचारी गेली आठ महिने दिवस रात्र राबत आहेत. तीनशे प्रवासी एकाच वेळी येण्यासाठी आणि जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
त्यामधे इमिग्रेशन चेकिंग, एटीएम, स्कॅनिंग, लगेज बेल्ट्स, क्रू रेसिडेंस आणि कॅफेटेरिया सारख्या सुविधांचा समावेश आहे. या सर्व बाबी नाशिकच्या औद्योगिक आणि आयटी क्षेत्रासाठी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकची धावपट्टी आज मितीस सर्वात मोठी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ड्रिमलायनर सारखी मोठी विमानंही इथे सहजगत्या उतरू शकतात. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांची नाशिककरांना आशा आहे.