पुणे – पाच राज्यात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुका तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी सध्याची प्रचलित इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे बदलून त्याऐवजी टोटलायझर मतदान यंत्रे वापरली जावीत असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. याच प्रकारचे पत्र यापूर्वी २३ मार्च २००९, ६ जुलै २००९ व ११ आक्टोबर २०११ सालीही लिहिल्याचे स्मरणही अण्णांनी या पत्रात करून दिले आहे.
घटनेप्रमाणे व निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदान करणार्या मतदाराची ओळख गुप्त राहणे बंधनकारक आहे मात्र सध्याच्या मतदान यंत्रणेत हे शक्य होत नाही कारण सध्या वापरात असलेल्या मतदान यंत्रात संबंधित जागेचे नांव तसेच वॉर्ड नंबर असतो. परिणामी विजयी उमेदवारला कोणत्या भागातून त्याला किती मते मिळाली हे सहज समजते. जेथून कमी मते मिळतील त्या भागाला त्यामुळे संबंधित उमेदवाराकडून सावत्रपणाची वागणूक मिळण्याचा धोका निर्माण होतो असे सांगून अण्णा म्हणाले की टोटलायझर मतदान यंत्रांमुळे हे धोका पूर्णपणे नाहिसा होऊ शकतो. ही यंत्रे एकमेकांशी केबलच्या सहाय्याने जोडलेली असतात व त्यात एकामागून एक मते नोंदविली जातात. सर्व मतदान यंत्रांवर ही मते येत असल्याने कोणत्या भागातून किती मते कुणाला पडली हे समजणे अशक्य असते.
उत्तर प्रदेशात या मतदान यंत्रांची चाचणी २००९ च्या निवडणुकात केली गेली होती मात्र त्यांचा वापर त्यानंतर मोठ्या प्रमाणावर केला गेलेला नाही असेही अण्णा म्हणाले