वॉशिंग्टन- पाकिस्तानात मुलींच्या शिक्षण हक्कासाठी आवाज उठवणा-या मलाला युसुफझाईची शांततेच्या नोबेल पुरस्काराची संधी हुकली आहे. पण तिचे व्हाईट हाऊसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.मलालाने व्हाईटहाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामांची भेट घेतली.
गेल्या काही दिवसांपासून होणा-या परिणामांची तमा न बाळगता मुलींच्या शिक्षण हक्कासाठी लढणा-या १६ वर्षीय मलालाचे ओबामांनी कौतुक केले. पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी आणि तळमळीने काम करत असल्याबद्दल ओबामांनी मलालाचे आभार मानले.शालेय शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलीचा अधिकार असल्याचा मलालाने जो विचार मांडला आहे त्याला अमेरिका पूर्णपणे सहकार्य करेल असे व्हाईट हाऊसतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
पाकिस्तानातील स्वात खो-यात दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणा-या मलालावर गेल्यावर्षी तालि्बानी दहशतवाद्यांनी गोळया झाडल्या होत्या. यात ती गंभीर जखमी झाली होती. ब्रिटनमधल्या रुग्णालयातील उपचारानंतर तिची प्रकृती सावरली. मलालाचे नाव यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी चर्चेत होते. मात्र रासायनिक शस्त्रास्त्र निर्मूलनाचे काम करणा-या ओपीसीडब्ल्यू संघटनेला हा पुरस्कार मिळाला.