
भारतावर विजय मिळविल्यावर द.आफ्रिका स्पिनरचे ‘जय श्रीराम’
भारताने द. आफ्रिकेविरुध्द वन डे सिरीज ०-३ ने गमावल्यावर द. आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराज याची ‘ जय श्रीराम’ वाली पोस्ट सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. भारताने द. आफ्रिकेविरुद्ध प्रथम कसोटी मालिका १-२ ने गमावल्यावर वन डे सिरीज सुद्धा गमावली आहे. भारतासाठी हा दौरा निराशाजनक असला तरी द. आफ्रिकेसाठी हे यश फार मोठे ठरले आहे. गेला काही काळ द. आफ्रिका संघ चांगल्या कामगिरीसाठी संघर्ष करत आहे. तशातच अतिशय मजबूत मानल्या जाणाऱ्या भारतीय टीम ला वन डे मध्येही पराभवाची चव चाखायला लावून मिळविलेला विजय त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट बनेल असे म्हटले जात आहे.
द.आफ्रिका टीम मध्ये या विजयामुळे जबरदस्त उत्साह संचारला असल्याचे खेळाडू सोशल मिडीयावर टाकत असलेल्या पोस्ट आणि फोटो मधून दिसत आहेच. पण द.आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराज याची पोस्ट सर्वाधिक व्हायरल झाली आहे. केशवच्या पोस्ट ने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ३ वन डे सिरीज मध्ये तीन बळी घेतले आहेतच पण विराट कोहलीला दोन वेळा औट केले आहे.
केशवने संघाच्या विजयाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तो म्हणतो,’ ही सिरीज शानदार ठरली. या पेक्षा अधिक अभिमानाची बाब दुसरी असू शकत नाही. आम्हाला या मुळे रिचार्ज होण्याची संधी आणि वेळ मिळाला. आम्ही पुढील कामगिरीसाठी तयार आहोत. जय श्रीराम ‘
७ जानेवारी रोजी डर्बन येथे जन्मलेला केशव डावखुरा स्पिनर आहे. त्याचे वडील आत्मानंद क्रिकेटर होते आणि स्थानिक क्रिकेट खेळत असत. त्याचे आजोबा सुद्धा क्रिकेटर होते. भारतात त्याचे पूर्वज राहत होते आणि १८७४ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून काम मिळविण्यासाठी द. आफ्रिकेला गेले होते.
