बॉलीवूड साठी नवी नाही सरोगसी

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना सरोगसीच्या माध्यमातून कन्यारत्नाची प्राप्ती झाली असून हे बाळ दिवस पूर्ण होण्याअगोदर जन्माला आल्याने अजून दवाखान्यातच आहे अशी बातमी आली आहे. बाळाच्या जन्माने प्रियांका आणि निक आनंदात आहेत. पण बॉलीवूड साठी सरोगसी नवी नाही. प्रियांका पूर्वी सुद्धा अनेक बॉलीवूड कलाकारांनी सरोगसीच्या माध्यमातून पालकत्व मिळविले आहे.

२०११ मध्ये आमीर खान आणि किरण राव यांनी आयव्हीएफच्या मदतीने जन्मास आलेल्या आझादचे असेच स्वागत केले होते. आझाद आता ९ वर्षाचा आहे. आमीरने सरोगसी साठी नेहमीच जनतेला प्रोत्साहन दिले आहे. सोहेल खान आणि सीमा खान यांनाही त्यांचा दुसरा मुलगा योहान सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. तर शाहरुख आणि गौरी यांच्या अबराम या मुलाचा जन्म सुद्धा २०१३ मध्ये याच प्रकारे झाला आहे.

अभिनेता तुषार कपूर हा सिंगल पेरेंट असून २०१६ मध्ये मुलगा लक्ष्य याचा जन्म सरोगसीतून झाला आहे. तुषार लक्ष्य चा सांभाळ आई आणि वडील अश्या दोन्ही भूमिका करून करत आहे. फिल्ममेकर करन जोहर यांची जुळी मुले, मुलगा यश आणि मुलगी रुही सरोगसी बाळे आहेत. त्यांचा जन्म २०१७ मध्ये झाला आहे. सनी लीयोनी आणि डेनियल यानाही सरोगसी माध्यमातून २०१८ मध्ये जुळी मुले झाली होती. त्यापूर्वी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती.

२०१९ मध्ये निर्माती एकता कपूर हिने सरोगसीने मुलाला घरी आणले आणि ती त्याची सिंगल मदर आहे. मुलाचे नाव तिने रवी ठेवले आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यानाही २०२० मध्ये सामिशा नावाची मुलगी सरोगसीने झाली आहे. प्रीती झिंटा आणि जीन गुडइनफ या जोडप्याला जय आणि जिया या नावाची जुळी भावंडे सरोगसीच्या माध्यमातून झाली आहेत. लग्नानंतर पाच वर्षांनी प्रीतीच्या घरी हे नवे पाहुणे आले आहेत.