‘शक्ती मिल’ बलात्कार प्रकरणी आज आरोप निश्चीती

मुंबई- काही दिवसांपूर्वी ‘शक्ती मिल’च्या परिसरात वृत्तछायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणा-या चार आरोपींवर सत्र न्यायालयात शुक्रवारी आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. आरोपींवर नेमक्या कुठल्या आरोपांखाली खटला चालविण्यात येणार आहे याचे प्रास्ताविक सरकारी पक्षातर्फे गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले. चार आरोपींवर ठेवण्यात येणा-या आरोपांचे प्रस्ताविक विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केले.

विजय जाधव, सिराज रहमान खान, मोहम्मद कासिम शेख ऊर्फ बंगाली आणि मोहम्मद सलीम अन्सारी या चार आरोपींवर ठेवण्यात येणा-या आरोपांचे प्रस्ताविक विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सादर करताना त्यांनी पुन्हा एकदा आरोपींनी या वृत्तछायाचित्रकार तरुणीवर कसा अमानुष सामूहिक बलात्कार केला, बीभत्स वर्तन करण्यासह तिला मारहाणही केली याची माहिती न्यायालयाला दिली.

सामूहिक बलात्कार करणे, मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करणे, पुरावे नष्ट करणे, मारहाण करणे आदी गंभीर आरोपांसह भादंविच्या विविध कलमांअंतर्गत एकूण १२ आरोप प्रस्तावित करण्यात आले. विशेष म्हणजे दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्यानंतर बलात्काराच्या व्याख्या व्यापक करण्यात येऊन त्यात विविध प्रकारच्या लैंगिक शोषणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणही नव्या व्यापक व्याख्येनुसार आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. हा खटला ६० दिवसांत निकाली काढण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन न्यायालयानेच दिले आहे. त्यामुळेच शुक्रवारी आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर सोमवारपासून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.