रुपयाच्या किमतीत २९ पैशांनी सुधारणा

मुंबई- बाजारात भांडवलाची आवक वाढल्याने व निर्यातदारांनी डॉलरची विक्री वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरबँकीय विदेशी चलन विनिमय बाजारपेठेत (फॉरेक्स) शुक्रवारी रुपयाच्या किमतीत २९ पैशांनी सुधारणा झाली. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आता ६१.१० इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसानंतर रुपयाच्या किमतीत २९ पैशांनी सुधारणा झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

गुरूवारी बाजार बंद होताना रुपया ५४ पैशांनी सुधारून रुपयाची किंमत प्रतिडॉलरसाठी ६१.३९ इतकी झाली होती. शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर रुपयाच्या किंमतीत आणखी २४ पैशांनी सुधारल्याने रुपया ६१.१० वर पोचला. बाजारात अमेरिकन चलनाच्या (डॉलर) विक्रीत वाढ झाली असून तसेच इतर आशियाई चलनांमध्येही डॉलरच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.

शुक्रवारी सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर भांडवलाची आवक वाढली व निर्यातदारांनी डॉलरची विक्री वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत (फॉरेक्स) रुपयाच्या किमतीत २९ पैशांनी सुधारणा झाली. गेल्या काही दिवसांपासून होत असलेली रूपयांची घसरण रोखली गेल्याने शेअर बाजारात जोरात उलाढाल सुरू होती.