नवी दिल्ली – सोशल मीडियाचा वापर करणार्या शहरी मतदारांपैकी ४२ टक्के मतदारांनी अद्यापही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करावयाचे याचा निर्णय घेतलेला नाही. टीएनएस आणि गुगल इंडिया यांनी इंटरनेटचा वापर करणार्या मतदारांमध्ये मतदारांविषयी कोणते विचारप्रवाह वहात आहेत याचा अंदाज घेतला तेव्हा हा निष्कर्ष निघाला.
३५ टक्के मतदारांनी कोणत्या पक्षाला मतदान करणार याचे निश्चित उत्तर दिले नाही. कोणत्या पक्षाला मतदान करावयाचे, याचबरोबर कोणत्या उमेदवाराला मतदान करावयाचे हेही महत्वाचे आहे असे या मतदारांचे म्हणणे आहे आणि म्हणून त्यांचे मतदान स्थानिक उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठरणार आहे. परंतु ३६ टक्के मतदारांनी कोणत्या पक्षाला मतदान करणार याचा निर्णय आताच घेतलेला आहे.
कोणत्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याचा विचार करून मतदान करणार्यांचे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. गुगल इंडियाचे हे सर्वेक्षण मार्च ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातल्या ६५ लोकसभा मतदारसंघात करण्यात आले आणि त्यासाठी ६० हजार ४२ मतदारांना प्रश्न विचारण्यात आले.
इंटरनेटच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचा पहिला तर कॉंग्रेसचा दुसरा क्रमांक आहे. बहुसंख्य नेटीझन्स्नी सोशल मीडियामध्ये नरेंद्र मोदींचा शोध घेतलेला आहे. त्या खालोखाल राहुल गांधी यांचा नंबर आहे. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल हेही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करतात असे आढळले आहे.