औरंगाबाद: पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये परदेशी पर्यटक अजूनही सुरक्षित नसल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. वेरुळमध्ये लेणी पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांसोबत छेडछाड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील ११ युवकांना प्रत्येंकी पाचशे रूपये दंड ठोठावला आहे.
मध्यप्रदेशातून आलेल्या काही युवकांनी वेरुळमध्ये लेणी पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांसोबत जबरदस्तीने फोटो काढण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर महिला पर्यटकांच्या अंगावरही हात टाकून फोटो काढला. यावेळी या युवकांनी अश्लील हावभाव करत त्यांच्या छेडछाडीचा प्रयत्न केला.
या टवाळखोरांच्या घोळक्यातून पर्यटक कसेतरी बाहेर पडले. पण त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली नाही. मात्र परिसरातल्या नागरिकांनी या टवाळखोरांचे फोटो काढून पोलिसांनी दिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून ११ जणांना अटक केली. याप्रकरणी त्यांना न्यायलायत हजरही करण्यात आले. परंतु हे सगळे टवळखोर फक्त पाचशे रुपयांचा आर्थिक दंड भरून बाहेरही पडले.