बीजिंग- चीन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा हिने कारा ब्लॅकसोबतच महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे लिएंडर पेसने डॅनियल नेस्टरसोबत पुरुष दुहेरीच्या अंतिम चारमध्ये धडक मारली. या जोडीने डेव्हिड मारेरो-फर्नाडो वर्दास्कीला पराभूत केले.तर दुसरीकडे नोवाक योकोविक, राफेल नदाल आणि मिलोस राओनिकने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पॅन पॅसिफिक ओपन विजेत्या सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅकने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जिई झेंग-यांग जून चानचा ६-४, ६-१ अशा फरकाने पराभव केला. आता उपांत्य फेरीत सानिया-काराचा सामना अव्वल मानांकित रॉबर्टा व्हिन्सी आणि सारा इराणीशी होणार आहे. इटलीच्या साराचे नुकतेच एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
नोवाक योकोविकने तिसर्याए फेरीत स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कीचा पराभव केला. त्याने ७-५, २-६, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. या पराभवासह स्पेनच्या खेळाडूचे आव्हान संपुष्टात आले. त्याने पहिल्या फेरीत भारताच्या सोमदेव देववर्मनला पराभूत केले होते. उपांत्यपूर्व फेरीत आता योकोविकचा सामना अमेरिकेच्या सॅम क्युरीशी होईल. त्याने सहाव्या मानांकित स्टॅनिलस वांवरिंकाला ६-३, ७-६ ने धूळ चारली. राफेल नदालने फिलिप कोश्लेचिबेरचा ६-४, ७-६ ने पराभव केला. त्याने एक तास ५५मिनिटांत विजय मिळवला. त्याचा सामना इटलीच्या फेबियोशी होईल.