नोबेल पुरस्कारासाठी पुतीन यांच्या नावाची सूचना

मॉस्को – अलीकडच्या जागतिक राजकारणामध्ये निर्माण होऊ पाहणारे अनेक पेचप्रसंग टाळण्यात निर्णायक भूमिका निभावल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस रशियातल्या एका संघटनेने केली आहे. इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ स्पिरिच्युअल युनिटी ऍन्ड को-ऑपरेशन या संस्थेने ही शिफारस केलेली आहे.

सीरियातील संघर्षातून मोठे युद्ध उद्भवले असते, परंतु ते पुतीन यांच्यामुळे टळले. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला पाहिजे असे या संघटनेचे मत आहे. २१ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलेला होता. तसा तो झाला असता तर मोठे युद्ध उद्भवले असते आणि त्यात अनेक देश गुंतले असते. पण हे संकट पुतीन यांनी टाळले.

सीरियामध्ये रासायनिक अस्त्रे असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे आणि त्यामुळे अमेरिकेने सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुतीन यांनी हस्तक्षेप केला आणि रासायनिक अस्त्रांची तपासणी करण्यात यावी अशी भूमिका घेतली. त्यानुसार आता तिथे खरेच रासायनिक अस्त्रे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

सीरियावर हल्ला करण्याची तयारी करणार्‍या बराक ओबामा यांना चार वर्षांपूर्वी शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिलेला आहे. मग पुतीन यांना तो का देऊ नये, असा सवाल या संस्थेने केला आहे. मात्र पुतीन हे रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संघटनेचे माजी संचालक आहेत आणि या संघटनेने जगभरात अनेक ठिकाणी हिंसाचार घडवलेला आहे. त्याचबरोबर चेचेन्यामध्ये झालेल्या बंडामध्ये बंडामध्ये पुतीन यांची भूमिका वादग्रस्त ठरलेली आहे. अशा परिस्थितीत त्यांना हा पुरस्कार द्यायचा का, असा सवाल अन्य काही लोक करत आहेत.