लंडन – वंश, शारीरिक छळ आणि पक्षपाती वागणूक दिल्यासंदर्भात बॅँकेतील आपल्या सहका-यांविरोधात लंडनमध्ये राहणा-या एका शीख व्यक्तीने बॅँकेविरोधात तब्बल 51 लाखांचा दावा ठोकला आहे. या व्यक्तीचे सहकारी नेहमी त्याच्या धर्माचा तिरस्कार करून त्याच्या पगडीशी छेडछाड करत असत, असा आरोपही त्यांनी सहका-यांवर केला आहे.
सौदी अरेबिया स्थित सांबा फायनान्शियल सर्व्हिस या बॅँकेच्या लंडनमधील शाखेत आयटी विभागात कार्यरत असलेल्या हरमिंदर धनोटा याला त्याच्या बॅँक सहका-यांकडून त्याच्या शीख धर्म व पगडीवरून सातत्याने अपशब्द ऐकवण्यात येत असे. अश्लील चित्रफीत पाहणे हे आपल्या धर्माच्या विरोधात असल्याचे बॅँकेचा व्यवस्थापक जॅक तन्ना याला माहीत असतानाही तो आपल्या जबरदस्तीने मोबाइलमधील अश्लील चित्रफीत दाखवून आपल्या भावना दुखावत असल्याचे धनोटा याने सांगितले.
महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यासंदर्भात त्याला विचारण्यात येत असे. इतके नव्हे तर त्याला रोज वेगवेगळया पद्धतीने मारहाणही करण्यात येत असे. पाठीत गुद्दे मारणे, बोटे पिरगाळणे, पट्टीने मारणे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात येत असे. ज्यामुळे त्याला असह्य वेदनांचा सामना करावा लागत असे. मात्र याचा त्याच्या कामावरही परिणाम होत असे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने 38 लाख इतकाच बिझनेस आणला होता. कार्यालयात त्याचा होत असणा-या छळामुळे त्याचा कामावर परिणाम होऊन त्याला गेल्या वर्षी 58 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. तसेच त्याबरोबर झालेल्या दुखापती वेगळया. जॅक या परदेशी व्यवस्थापकाप्रमाणेच या बॅँकेत असलेल्या भारतीय सहका-यांकडूनही त्याचा छळ करण्यात आल्याने त्याला अधिकच दु:ख झाले.
ऑक्टोबर 2012 मध्ये बॅँकेच्या आणखी एका भारतीय व्यवस्थापकाने त्याच्या पगडीमध्ये लाइट पेटते का?’ असा प्रश्न विचारत त्याचा अपमान केला. तसेच दुस-या वरिष्ठ भारतीय व्यवस्थापकाने त्याच्या पगडीवर कागद चिटकवून त्या कागदावर येथे स्वाक्षरी करा’ असे उपहासात्मक लिहिले होते.