सुदानमध्येही सरकारविरोधी आंदोलन

खार्टूम – पूर्व आफ्रिकेच्या किना-यावरील अत्यंत महत्त्वाचा देश असलेल्या सुदानमध्ये राष्ट्राध्यक्ष ओमर हसन अल-बशीर यांच्या विरोधातील आंदोलन गेल्या आठवडाभरापासून पेटले असून सुमारे सातशे जणांना यासंदर्भात अटक करण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी सूत्रांनी दिले.

सरकारी अनुदानात घट करण्यात आल्याच्या विरोधात सुदानमध्ये आंदोलन पेटले असून पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी आश्रूधुराचा वापर केला आहे. खार्टूममधील अहफाद विद्यापीठामधील महिला विद्याथ्र्यांनीही सरकारविरोधात निदर्शने करताना बशीर यांच्या विरोधात घोषणा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. बशीर यांची राजवट उलथून टाकण्यासंदर्भात या वेळी निदर्शकांनी घोषणा दिल्या.

सुदानच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या संघर्षात 34 लोक ठार झाले आहेत; परंतु सुदानमधील मानवाधिकार संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत बशीरविरोधी आंदोलनात सुमारे 150 जण ठार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संघर्षात सुदानच्या सीमारेषेवरील बंडखोरही घुसल्याचे अंतर्गत सुरक्षामंत्री इब्राहिम महमूद हमाद यांनी सांगितले आहे. मात्र बशीर यांच्या फौजा आंदोलनकत्र्यांची हत्या करण्यात सहभागी असल्याचे मानले जात आहे.