बीजिंग – भारताच्या विरोधात कायम कुरापती काढणा-या चीनला वादग्रस्त सीमा प्रश्नी अखेर उपरती झाली आहे. सीमेवर शांतता नांदली तरच उभय देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारू शकतील, या गोष्टीचे महत्त्व चीनला पटले आहे त्यामुळेच मनमोहनसिंग यांच्या आगामी दौ-यात त्यावर चर्चा होऊन दोन्ही देशांत सहमती होईल, असे संकेत मिळाले आहेत.
सीमा प्रश्नावरील भारत-चीन समन्वय-सल्लागार समितीची चौथी बैठक नुकतीच बीजिंगमध्ये पार पडली. बैठकीत दोन्ही देशांचे अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत सीमा सुरक्षा सहकार्य कराराच्या (बीडीसीए) प्रस्तावावर उभय देशांच्या प्रतिनिधींकडून विचार-विनिमय झाला. त्यात सीमेवर शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
सरहद्दीवर शांतता निर्माण झाली तरच द्विपक्षीय संबंध प्रगतिपथावर जाऊ शकतील, हे चिनी अधिका-यांनी या वेळी मान्य केले. बैठकीचा एकूण सूर अत्यंत सकारात्मक असल्याचे दिसून आले. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांकडून गस्त घालण्या संबंधीदेखील सहमती दर्शविण्यात आली. त्याच बरोबर सैन्य व सीमेवरील काही प्रश्नांचीदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली. ही बैठक दोन दिवस चालली.
ही बैठक स्पष्ट आणि सकारात्मक वातावरणात पार पडली, असे भारतीय दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले. पश्चिमेकडील विभागावर बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूने शांततेसाठी प्रयत्न करण्यावर सहमती व्यक्त झाल्याचे भारताकडून सांगण्यात आले. भारताचे पूर्व आशियाचे संयुक्त सचिव गौतम बंबावाले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही चर्चा केली. शिष्टमंडळात संरक्षण, गृह, इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांचे प्रतिनिधीही सहभागी होते.