१५ ते १८ वयोगट, करोना लसीकरण सुरु

देशात १५ ते १८ वयोगटासाठी कोविड १९ लसीकरण ३ जानेवारी पासून सुरु झाले असून रविवारी सायंकाळ पर्यंत यासाठी सुमारे ८ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मुलांना देण्यात येणारी लस अन्य लसीकरण मोहिमेत एकत्र होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, या लसीकारणासाठी वेगळी रांग असेल, वेगळी वेळ असेल आणि लस देणारा स्टाफ वेगळा असेल. या वयोगटासाठी फक्त कोवॅक्सिन हीच लस दिली जाणार आहे.

देशात या वयोगटातील १० कोटी मुले आहेत. लसीकरण योग्य प्रकारे राबविले जावे यासाठी मांडविया यांनी रविवारी राज्य आणि केन्द्रशासीत प्रदेशांचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव आणि आरोग्यमंत्री यांच्याबरोबर ऑनलाईन बैठक केली आहे. या लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी १०वी चे प्रमाणपत्र सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे. कोविनवर लसीसाठी नोंदणी करता येणार आहे त्याचप्रमाणे थेट लसीकरण केंद्रावर सुद्धा नोंदणी होणार आहे.

जगात ३० पेक्षा अधिक देशात १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. मुलांना करोनाचा संसर्ग झाला तरी तो गंभीर होत नसल्याचे खरे असले तरी ही मुले स्प्रेडर बनू शकतात तसेच ज्या मुलांना मधुमेह, अस्थमा आहे किंवा जी मुले स्थूल आहेत त्यांना करोनाचा संसर्ग होण्याचे शक्यता अधिक आहे हे लक्षात घेऊन मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. लसीकरण झालेली मुले शाळा, गर्दीची ठिकाणे, क्रीडा मैदाने येथे अधिक सुरक्षित राहतील असे सांगितले जात आहे.